ऐन दिवाळीत तीन जणांवर काळाचा घाला ; बरड येथे कार व कंटेनरचा अपघात

फलटण : आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बरड ता. फलटण गावच्या हद्दीतील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कार व कंटेनर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनरसह पळ काढला परंतु राजुरी ता. फलटण येथे कंटेनर बंद पडल्याने तो जागेवर सोडून चालक पसार झाला आहे.
सागर रामचंद्र चौरे वय ३४ रा. पाडेगाव ता. खंडाळा, भाऊसो आप्पा जमदाडे वय ४५ रा. खेड बु., ता. खंडाळा, निलेश चंद्रकांत शिर्के वय ४० हल्ली रा. वेटणे ता. खटाव, मूळ रा. खटाव ता. खटाव अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, कर्नाटक राज्यातील विजापूर येथे बंद पडलेला ट्रक दुरुस्त करण्यासाठी सागर चौरे, भाऊसो जमदाडे व निलेश शिर्के हे तिघे जण कार क्र. एमएच ५३ ए ०५१४ या कार मधून विजापूर येथे गेले होते. काम आटोपून ते परतीच्या प्रवासात असताना गुरवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडे चारच्या सुमारास त्यांच्या कारला बरड ता. फलटण गावच्या हद्दीत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनर क्र. एमएच ४६ सीएल ९६५१ ने वेगाने धडक दिली. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्कचूर झाला. अपघातानंतर चालकाने कंटेनरसह पळ काढला. परंतु अपघातामध्ये कंटेनरचा रेडीएटर फुटल्याने तो राजुरी ता. फलटण या गावाजवळ बंद पडला. चालकाने कंटेनर जाग्यावरच सोडून तेथून पळ काढला. अपघाताची माहिती समजताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तातडीने घटना स्थळाला भेट दिली. त्यांनी कार मधील जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले परंतु उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला होता.
या अपघाताची फिर्याद सुरज संतोष खरात रा. पाडेगाव ता. खंडाळा यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!