भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडविण्याची ताकद धनगर समाजात ; या विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित – भाऊसाहेब मरगळे

भोर – भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात गेली वर्षानुवर्षे धनगर समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आपला हक्क प्राप्त करण्यासाठी धनगर व समस्त बहुजन समाज या विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज झाला असून या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे असा विश्वास सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते तथा वेगेरे ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांनी व्यक्त केला आहे.
भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सदर विश्वास व्यक्त केला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या डोंगरी भागातील व महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा व विखुरलेला मतदार संघ अशी ओळख असणाऱ्या या विधानसभा मतदार संघामध्ये भोर, मुळशी व राजगड (वेल्हा) या तालुक्यांचा समावेश आहे. २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघात चार लाख २१ हजार मतदार आपला विधानसभेचा प्रतिनिधी निवडणार आहेत. या मतदार संघात २०११ साली एकूण पन्नास हजार धनगर समाजाचे मतदार होते. २०२४ साली ती संख्या सत्तर हजारांच्याही वरती पोहचली आहे. त्यामुळे या निवडणुकीत धनगर समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे. धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर आजवर महाविकास आघाडी अथवा महायुती मधील पक्ष व त्यांच्या नेतृत्वांनी जाणीवपूर्वक झुलवत ठेवले आहे. त्यामुळे आता आमचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज वेगळी भूमिका घेणार असून त्याचा फटका निश्चितपणे येथील प्रस्थापितांना बसणार आहे.
आजवर या मतदार संघातून आमदार संग्राम थोपटे हे या भोर मतदार संघातून तीन वेळा अल्प मताधिक्याने निवडून आले आहेत. परंतु आजही या मतदार संघातील अनेक धनगर वाडे मूलभूत विकासापासून वंचित आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, वीज आदी मूलभूत गरजासाठी त्यांची आजही ससेहोलपट होत आहे. या व्यतिरिक्त पंचायत समिती, जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही समाजाला डावलण्यात आले आहे. म्हणूनच यंदा हा समाज परिवर्तन घडविण्याच्या तयारीत आहे. या मतदार संघातून धनगर समाजाचा प्रतिनिधी निवडून यावा, यासाठी येथील समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली आहे. त्यामध्ये धनगर समाजाचे सुशिक्षित, अभ्यासू उमेदवार म्हणून मला पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय झाला असल्याचे भाऊसाहेब मरगळे यांनी स्पष्ट केले.
या विधानसभा निवडणुकीत आपण जरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी राज्यातील ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, छत्रपती शासन सह अनेक छोट्या छोट्या नोंदणीकृत राजकीय पक्षांचा व मयक्रो ओबीसी समाजाचा आपणास जाहीर पाठिंबा आहे. वंचित बहुजन आघाडी, रासप व महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठीही आपण प्रयत्नशील असून लवकरच त्यांचे पाठिंब्या चे पत्र मला मिळेल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वांनी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन भाऊसाहेब मरगळे यांनी मतदारांना केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!