दीपक चव्हाण, सचिन पाटील व दिगंबर आगवणे यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधकांचे हे होते आक्षेप

फलटण : फलटण विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र छाननीचा दिवस प्रमुख पक्षातील उमेदवारांच्या अर्जावर घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे आजचा दिवस चांगलाच चर्चेचा ठरला.
२५५ फलटण विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात सुरु झाली. छाननीला सुरुवात होताच सनय छत्रपती शासन पक्षाचे उमेदवार दीपक रामचंद्र चव्हाण यांच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांनी उमेदवारी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यामध्ये काही गुन्ह्यांची माहिती लपवली आहे असा आक्षेप घेऊन दिगंबर आगवणे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्या अर्जावरही आक्षेप घेताना, दीपक चव्हाण हे संस्थेमध्ये नोकरी करतात, त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी संस्थेची परवानगी घेतलेली नाही व अनुदानित संस्थेमध्ये नोकरी करून ते लाभाचे पद धारण करतात, त्यामुळे त्यांचाही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी हरकत घेण्यात आली होती. आमदार दीपक चव्हाण यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर पाटील यांच्या जातीच्या दाखल्याच्या अनुषंगाने ते खाटीक समाजाचे नसून क्षत्रिय मराठा आहेत असा आक्षेप घेऊन त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. सदर आक्षेप घेताना दोन्ही बाजूंनी निष्णात वकिलांची फौज वाद प्रतिवाद करण्यासाठी उभी करण्यात आली होती.
सर्वांचे युक्तिवाद ऐकून घेतल्या नंतर सर्व कायदेशीर तरतुदींची स्पष्टता तपासून, लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदी आणि भारतीय राज्य घटनेतील तरतुदी या सर्वांचे दाखले देत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व आक्षेप खोडून काढले व दीपक चव्हाण, सचिन पाटील व दिगंबर आगवणे यांचे नामनिर्देशन पत्र तथा उमेदवारी अर्ज वैध ठरविले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!